शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेचे संस्कार,सैनिक स्कूलमध्ये एनसीसी शिबिर

Fri 17-Jul-2026,11:14 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: सैनिक स्कूल चंद्रपूर येथे राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) अंतर्गत संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिराला गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. १६ ते २५ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या दहा दिवसीय शिबिरात विविध शाळा व महाविद्यालयांतील एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले असून, त्यांना आधुनिक लष्करी कौशल्यांसह नेतृत्व, शिस्त आणि राष्ट्रसेवेचे सर्वांगीण प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शिबिराचे उद्घाटन इंडिपेंडेंट एनसीसी कंपनी, सैनिक स्कूल चंद्रपूरच्या कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल रुबी दीक्षित यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी त्यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन करताना दृढनिश्चय, सकारात्मक दृष्टिकोन आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, असे सांगितले.

एनसीसीचे प्रशिक्षण हे केवळ लष्करी कौशल्यांपुरते मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिबिराच्या पहिल्याच दिवशी कॅडेट्सना शिबिराची दिनचर्या, शिस्तीचे नियम, सुरक्षा उपाययोजना तसेच एनसीसीचे एकता आणि शिस्त हे ब्रीदवाक्य याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर शारीरिक प्रशिक्षण, संचलन आणि प्राथमिक लष्करी शिस्तीचे प्रशिक्षणही देण्यात आले.

दहा दिवसांच्या या शिबिरात संचलन, शस्त्र प्रशिक्षण, नकाशा वाचन, फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, प्रथमोपचार, नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास, योग, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध स्पर्धा आणि गट उपक्रमांच्या माध्यमातून कॅडेट्समध्ये संघभावना, सहकार्याची वृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

शिबिराचा समारोप २५ जुलै रोजी होणार असून, समारोप समारंभात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सचा गौरव करून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.