PWD आमदार निधीतून मंजूर काम ३० दिवसांपासून रखडले;
PWD आमदार निधीतून मंजूर काम ३० दिवसांपासून रखडले;
आठवड्याभरापासून पूर्णतः ठप्प – खारंगणा (गोडे) ग्रामपंचायत प्रशासनाकडे गंभीर दुर्लक्ष
खारंगणा (गोडे) | तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा
खारंगणा (गोडे) येथील PWD आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेले व सार्वजनिक उपयोगासाठी सुरू असलेले कंपाउंडचे काम गेल्या तब्बल ३० दिवसांपासून रखडले असून, मागील एक आठवड्यापासून हे काम पूर्णतः ठप्प असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्धवट अवस्थेत काम सोडून दिल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन, PWD विभाग व संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सदर कामाला महिनाभरापूर्वी मंजुरी मिळूनही अद्याप ते पूर्ण करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, अनेक दिवसांपासून संबंधित PWD अभियंता कामस्थळी अनुपस्थित असल्याचा आरोप होत असून, कोणतीही तांत्रिक देखरेख दिसून येत नाही. काम अचानक का थांबवण्यात आले, याबाबत ग्रामपंचायत किंवा PWD प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व संतापाचे वातावरण आहे.
अर्धवट अवस्थेतील कंपाउंडमुळे परिसरात अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून, विशेषतः लगत असलेल्या बाल अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना दररोज या धोकादायक परिसरातून ये-जा करावी लागत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. ३० दिवसांपासून रखडलेले व आठवड्याभरापासून ठप्प असलेले सार्वजनिक काम म्हणजे PWD आमदार निधीचा उघड अपव्यय असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित PWD अभियंता, ठेकेदार तसेच ग्रामपंचायत खारंगणा (गोडे) यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच रखडलेले काम तात्काळ सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या अर्धवट कामामुळे बाल अंगणवाडीतील किंवा इतर कोणत्याही नागरिकांच्या जीवितास हानी झाल्यास संबंधित PWD अभियंता, ठेकेदार, ग्रामपंचायत खारंगणा (गोडे) तसेच जिल्हा प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून, या प्रकारामुळे शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.