बल्लारपूरात अतिक्रमणामुळे ट्रक आणि बस मध्ये भीषण अपघात,ट्रकच्या धडकेत बस वाहकाचा मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
बल्लारपूर : शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज घडलेल्या भीषण अपघातात एका एसटी वाहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रकने स्कूटीला दिलेल्या जबर धडकेत स्कूटी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाजवळ घडली.
मृतकाचे नाव श्रीराम मंग्या जाटोत (५५) रा. फुलसिंग नाईक वॉर्ड, बल्लारपूर असे असून ते चंद्रपूर एसटी आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.
बुधवारी ते घरगुती साहित्य आणण्यासाठी स्कूटी क्रमांक एमएच ३४ वाय ७०४१ ने जुना बसस्टँडकडे जात असताना ग्रामीण रुग्णालयाजवळ मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३४ बीझेड ५८९७ ने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत श्रीराम जाटोत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालक संतोष कृष्णकुमार टंडन (२७), रा. सिंदोला, ता. वणी, जि. यवतमाळ याला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित ट्रक जेएसटी कंपनीचा असून तो पेपर मिलमधील राखड वाहून नेले जात होते.
दरम्यान, बल्लारपूर शहरात मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक दुकानदारांनी रस्त्यालगत दुकाने व साहित्य मांडल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे व पोलीस अंमलदार नरेंद्र वाकडे करीत आहे.