देशी दारूची अवैध वाहतूक उघड; सिंधी रेल्वे पोलिसांची धडक कारवाई

Sun 08-Mar-2026,03:59 AM IST -07:00
Beach Activities

देशी दारूची अवैध वाहतूक उघड; सिंधी रेल्वे पोलिसांची धडक कारवाई

वर्धा | तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा

सिंधी रेल्वे : दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सिंधी रेल्वे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, सेलडोह ते सिंधी रोड मार्गावरून एका लाल रंगाच्या ॲपे वाहनातून देशी दारूची अवैध वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी करून तपासणी मोहीम राबवली.

नाकेबंदी दरम्यान लाल रंगाचे ॲपे वाहन क्रमांक MH 32 AK 2186 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारू आढळून आली. या प्रकरणी योगेश सुनील वरघने (वय ३० वर्ष) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सदर दारू शाहरुख पठाण व सुलेमान उर्फ भुर्या पठाण (दोन्ही रा. सिंधी रेल्वे) यांची असल्याचे त्याने सांगितले. तसेच तो त्यांच्या कडे रोजंदारीवर दारू वाहतूक करण्याचे काम करत असल्याची कबुली त्याने दिली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी १५ पेट्या देशी दारू जप्त केल्या. प्रत्येक पेटीत ४८ शिश्या प्रमाणे एकूण ७२० शिश्या आढळून आल्या असून त्यांची किंमत सुमारे १,०८,००० रुपये आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले लाल रंगाचे ॲपे वाहन (क्र. MH 32 AK 2186) किंमत अंदाजे ३,००,००० रुपये व वाहनाच्या मागील भागात दारू लपवण्यासाठी वापरण्यात आलेली रबरी मॅट (किंमत १,००० रुपये) असा एकूण ४,०९,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी नमूद तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धनराज सायाम (ब.न. १२८६), नापोअं पंकज घोडे (ब.न. १३९६) व पोलीस अंमलदार समीर आगे (ब.न. ३८३) यांनी केली.