न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जीनियस येथे राष्ट्रीय युवा दिन व जिजामाता जयंती उत्साहात साजरी

Mon 12-Jan-2026,07:07 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा

वर्धा : न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जीनियस, वर्धा येथे दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. बी. बावनकर (माजी प्राध्यापक, जे. बी. सायन्स कॉलेज, विदर्भ प्रमुख – विवेकानंद केंद्र, वर्धा), जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल निमगडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक डॉ. देवेंद्र गुजरकर उपस्थित होते.

राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सुमधुर गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. नववीतील विद्यार्थी नवाज खान याने स्वामी विवेकानंदांची भूमिका साकारत त्यांच्या जीवनकार्याविषयी प्रभावी सादरीकरण केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “उद्याचा देश घडवायचा असेल तर आजचा युवक घडवला पाहिजे.” आत्मविश्वास, कर्तव्यभावना, राष्ट्रभक्ती व चारित्र्यनिर्मितीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच कर्तृत्ववान, संस्कारी व देशप्रेमी स्त्री म्हणून राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावरही मान्यवरांनी प्रकाश टाकला. मुख्याध्यापक डॉ. देवेंद्र गुजरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार सन २००१ मध्ये डॉ. देवेंद्र गुजरकर यांना प्राप्त झाला होता. त्या पुरस्काराला २५ वर्षे पूर्ण झाल्याची आठवण अनिल निमगडे यांनी करून दिली. भविष्यात शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनाही हा सन्मान मिळावा, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या. कठोर परिश्रमातूनच देश प्रगतीच्या मार्गावर जाईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रजनी भोयर यांनी केले, तर आभारप्रदर्शन शिक्षिका सविता वरघणे यांनी केले. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याविषयी माहिती पर्यवेक्षिका निशा मॅडम यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबिता राऊत, प्रगती निशाने, राधा घाटोळे, शंकर तिखे, पर्यवेक्षिका वैशाली लाडेकर तसेच सनफ्लावर हाऊसच्या प्रमुख शिक्षिका प्रांजली वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

याचप्रसंगी विदर्भ विज्ञान उत्सवात सहभाग घेतल्याबद्दल साई कठाने व वैदेही बुध बावरे यांचा विदर्भस्तरीय सहभागासाठी गौरव करण्यात आला. तसेच निसर्ग सेवा समिती अंतर्गत झालेल्या चित्रकला स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळविल्याबद्दल विद्यार्थिनी विना कुरील हिला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.