सर्वोदय कार्यक्षेत्रातील मानाचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Sun 15-Mar-2026,10:20 PM IST -07:00
Beach Activities

वर्धा : सर्वोदय कार्यक्षेत्रातील मानाचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण

वर्धा जिल्ह्यात सर्वोदय सामाजिक कार्यक्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी पूज्य जयवंत मटकर स्मृती पुरस्कार वर्ध्यातील ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्ते तसेच सेंद्रिय शेती व ग्रामोद्योगाचे पुरस्कर्ते ज्ञानेश्वरजी ढगे यांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पूज्य अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे पुरस्कार यापूर्वी विविध वर्षांत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रदान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये स्व. बिहारीलालभाई नागवान (२०१८), रमेशजी दाणे (२०२०) आणि जीवन सर्वोदयी उर्फ इंगळे गुरुजी (२०२२) यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास गुरुदेव सेवा मंडळाचे श्रद्धेय हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. उल्हास जाजू, सर्व सेवा संघाचे प्रबंधक विश्वस्त मोहम्मद शेख हुसेन, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण भोयर, किसान अधिकार अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार तसेच डॉ. सुगंध बरंठ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश दाणे यांनी भूषविले.

पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट करताना मान्यवरांनी सांगितले की, या पुरस्काराने सन्मानित होणारे कार्यकर्ते आपल्या कार्यक्षेत्रात गांधी–विनोबा यांच्या विचारांवर आधारित रचनात्मक कार्य आणि सामाजिक संघर्ष करत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहेत. त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात सर्वधर्म प्रार्थना व एकादश व्रताने झाली. सर्व पुरस्कर्त्यांचा परिचय किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शिवचरण ठाकूर यांनी केले, पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. अपश्चिम बरंठ यांनी प्रस्ताविक मांडणी केली, तर समितीचे सचिव संजय बेहेरे यांनी आभार प्रदर्शन केले.

या सोहळ्यास महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील सर्वोदय पदाधिकारी, वर्ध्यातील गणमान्य सामाजिक कार्यकर्ते तसेच किसान अधिकार अभियानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रा. बबन कानकीरड, प्रा. देवानंद कांबडी, एकनाथजी डगवार, कैलास मते, प्रफुल कुकडे, गुरुचरण ठाकूर, मनोहरजी पंचारिया, मायाताई धांडे, स्वाती भाटिया, नचगिरीवार गुरुजी, जिजाताई ढगे आणि उमेश नारांजे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन उगले, विक्रांत कांबळे, जीवन शेंडे, बैनाताई वाचनेकर, मनीष मगर, चंद्रकांत ढगे, अनंतराव ठाकरे, रमेश झाडे, बाळासाहेब मिसाळ, सुरेश लटारे, नम्रता ढगे, यशवंत ढगे, सिद्धेश्वर उमरकर आणि पंडित चन्नोळे आदींचे विशेष योगदान लाभले.