नगर परिषदेने दोन तासांत खुला केला मुख्य मार्ग,ठेकेदारावर कारवाईची नागरिकांची मागणी
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास शतकभर जुने कडुनिंबाचे विशाल झाड कोसळल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. मात्र नगर परिषदेने तातडीने कारवाई करत अवघ्या दोन तासांत झाड हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
ग्रामीण रुग्णालय परिसरात सध्या संरक्षक भिंतीचे (वॉल कंपाऊंड) बांधकाम सुरू असून हे काम सिंघवी ठेकेदार यांच्यामार्फत करण्यात येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, क्रेनच्या सहाय्याने करण्यात आलेल्या खोदकामामुळे कडुनिंबाच्या झाडाची मुळे तुटली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या खोदकामामुळे झाड कमकुवत झाले आणि गुरुवारी दुपारी ते अचानक कोसळले.
या घटनेसाठी सिंघवी ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डेपो झोन स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कटर आणि क्रेनच्या सहाय्याने झाडाचे तुकडे करून सुमारे दोन तासांत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
दरम्यान, पोलीस विभागाने घटनास्थळी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली. घटनेनंतर संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाईची मागणी जोर धरत असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.