महात्मा फुले व आयुष्मान योजनेत न बसणाऱ्या गंभीर शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत देण्याची मागणी
प्रतिनिधि:अमन नारायणे वर्धा
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील अनेक गरीब व गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचारांचा लाभ मिळतो. मात्र या योजनांमध्ये अनेक गंभीर आजार व महागड्या शस्त्रक्रिया समाविष्ट नसल्यामुळे रुग्णांच्या कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढावत आहे.
हृदयविकार, मेंदूविकार, किडनी विकार, कर्करोग (कॅन्सर) यांसारख्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी ४ ते ५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीतून सध्या मिळणारी आर्थिक मदत अत्यंत अपुरी ठरत असून, निधीच्या मर्यादेमुळे अनेक वेळा रुग्णांचे प्राण धोक्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट नसलेल्या गंभीर आजारांच्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून किमान ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक गरीब व गरजू रुग्णाला वेळेत व सुलभ पद्धतीने उपचार मिळावेत, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल भाऊ पांडे, जिल्हा संघटक दिनेश परचाके, जिल्हा संपर्क प्रमुख अमित भोसले, शेखर इंगोले, वर्धा तालुका प्रमुख इरशाद शहा, उपाध्यक्ष वर्धा अमन नारायण, अमीन पठाण, प्रशांत पाटील, प्रमोद देवढे, अरुण गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.