‘लालपरी संगे नाते आमुचे’ उपक्रमामुळे अल्लीपूरच्या ज्येष्ठांना देवदर्शनाचा आनंद
लालपरी संगे नाते आमुचे’ उपक्रमामुळे अल्लीपूरच्या ज्येष्ठांना देवदर्शनाचा आनंद
अल्लीपूर | तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लालपरी संगे नाते आमुचे’ या सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून हिंगणघाट आगाराची एस. टी. ‘लालपरी’ बस अल्लीपूर येथून नियमितपणे देवदर्शनासाठी सुरू आहे. या उपक्रमामुळे अल्लीपूरसह परिसरातील गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेमुळे आयुष्यात कधीही एस. टी. बसने प्रवास न केलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना पहिल्यांदाच ‘लालपरी’ने प्रवासाचा आनंद अनुभवता आला. विशेषतः ज्या वृद्ध महिला-पुरुषांना फिरण्यासाठी कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळत नाही, त्यांच्यासाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायी ठरत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल हिंगणघाट बस आगाराचे बस्थानक प्रमुख जयंत सडमाके, डेपो मॅनेजर शेंडे तसेच संपूर्ण आगार कर्मचाऱ्यांप्रती अल्लीपूर व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दि. २ फेब्रुवारी रोजी अल्लीपूर येथून ४० भाविक प्रवाशांना घेऊन अल्लीपूर–पंढरपूर देवदर्शनासाठी एस. टी. बस यशस्वीरीत्या रवाना करण्यात आली.
अल्लीपूर गावातून अशाच प्रकारे नियमित देवदर्शनासाठी एस. टी. बस सुरू ठेवावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांसह महिला व पुरुष नागरिकांनी हिंगणघाट आगार प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी प्रवासी शरद कारवटकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,
“हा उपक्रम आमच्यासाठी देवदत्त ठरला असून आमच्या आयुष्यात नवा आनंद घेऊन आला आहे,” असे सांगितले.