वर्धा जिल्ह्यात पोलीस शिपाई भरती प्रक्रिया उत्साहात सुरू

Tue 17-Feb-2026,05:04 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्ह्यात पोलीस शिपाई भरती प्रक्रिया उत्साहात सुरू,आज ८०० पैकी ४०१ उमेदवार यशस्वी

वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण

वर्धा जिल्ह्यातील १३४ पोलीस शिपाई (पुरुष व महिला) रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया सध्या उत्साहपूर्ण, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या वतीने उमेदवारांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आज, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या शारीरिक चाचणीसाठी एकूण ८०० उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी ५७५ उमेदवार प्रत्यक्षात हजर होते. शारीरिक मोजमापात ३२ उमेदवार अपात्र ठरले, तर मैदानी चाचणीत १४१ उमेदवार अपात्र झाले. एकूण ४०१ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले असून एका उमेदवाराला प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी सुविधा

बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी मैदान परिसरात माफक दरात नाश्ता, झेरॉक्स मशीन व फोटोग्राफरची सोय करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, वैद्यकीय पथक, दोन सुसज्ज रुग्णवाहिका तसेच मोबाईल शौचालयांची व्यवस्था उपलब्ध आहे.

१६०० मीटर धावण्याच्या चाचणीसाठी पोलीस मुख्यालय ते धावण्याच्या ठिकाणादरम्यान उमेदवारांच्या ने-आणेसाठी पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाबाहेरील उमेदवारांसाठी महात्मा लॉन (नालवाडी), महादेव मंदिर (महादेवपुरा) व तुकाराम मठ (रामनगर) येथे मोफत निवासाची सुविधा देण्यात आली आहे.

पारदर्शक भरती प्रक्रिया

संपूर्ण भरती प्रक्रिया निःपक्षपाती व पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून मैदान परिसरावर सीसीटीव्ही व व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. भरती प्रक्रियेच्या समन्वयासाठी पोलीस निरीक्षक श्री. नागेशकुमार चतरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आवाहन

भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असून उमेदवारांनी कोणत्याही अफवा, दलाल किंवा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.