चीनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्कूल गेम्ससाठी वर्ध्याच्या पंकज टाकोणे यांची भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड
चीनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्कूल गेम्ससाठी वर्ध्याच्या पंकज टाकोणे यांची भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड
वर्धा : प्रतिनिधी इरशाद शाह
वर्धा जिल्हा पोलिस दलासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली असून, वर्धा पोलिस दलातील कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी तसेच राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू पंकज टाकोणे यांची चीनमधील शेंगलू येथे होणाऱ्या प्रतिष्ठित वर्ल्ड स्कूल गेम्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. ही स्पर्धा ३० जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
पोलिस सेवेसोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंकज टाकोणे यांनी आपल्या मेहनत, शिस्त, समर्पण आणि खेळावरील निष्ठेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या मानाच्या निवडीमुळे वर्धा पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
ग्रामीण भागातील अनेक होतकरू खेळाडूंना घडविण्यात तसेच त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यात पंकज टाकोणे यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रशिक्षक मंडळात स्थान मिळाल्याने त्यांच्या क्रीडा कारकिर्दीत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
वर्धा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीही ही निवड प्रेरणादायी ठरत असून, कर्तव्य आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत उत्कृष्टता साध्य करता येते, याचे पंकज टाकोणे हे उत्तम उदाहरण ठरले आहेत.
पंकज टाकोणे यांच्या या यशामागे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे तसेच वर्धा पोलिस दलाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख श्री. राजेश उमरे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल वर्धा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, क्रीडाप्रेमी आणि जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
देशसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही भारताचा तिरंगा उंचावण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पंकज टाकोणे यांची ही निवड युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून वर्धा पोलिस दलाच्या गौरवशाली परंपरेत भर घालणारी ठरली आहे.