वसमत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची लूट! उपचारांच्या नावाखाली प्रत्येकी एक हजार रुपये उकळल्याचा आरोप
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण झाला असून, तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने मात्र या प्रकरणात कानावर हात ठेवले आहेत.
वसमत तालुक्यातील सुमारे ३० ते ३५ रुग्ण कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सदर रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनी सोमवारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या आवश्यक तपासण्या केल्या.
त्यानंतर मात्र रुग्णांच्या नातेवाईकांकडे आर्थिक रक्कमेची मागणी सुरू करण्यात आली. यामध्ये काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून ५०० तर काही जणांकडून तब्बल एक हजार रुपये उकळण्यात आले. यामध्ये बहुतांश नातेवाईकांनी पैसे दिल्याचे स्पष्ट केले, विशेष म्हणजे संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी छायाचित्रांकरण देखील पैसे दिल्याचे सांगून आपला रोष व्यक्त केला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक काय म्हणाले?
वसमत उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून रुग्ण पाठविले जातात. सदर शस्त्रक्रिया मोफत असते. मात्र पैसे नेमके कोणत्या पातळीवर घेण्यात आले याची चौकशी करण्याचे अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
- डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक
वैद्यकीय अधीक्षकांची भूमि का काय?
या संपूर्ण प्रकरणात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे यांनी पुढाकार घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करणे अपेक्षित आहे. व्हायरल व्हिडिओची चौकशी होणार का? पैशाची मागणी करणाऱ्यावर कारवाई होणार का? की ही प्रकरणही चौकशीच्या नावाखाली थंड बस्त्यात जाणार? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांची लूट:
वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात झालेला प्रकार संतापजनक आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्ण या ठिकाणी येतात. मात्र त्यांची आर्थिक पिळवणूक होत असून हा प्रकार चुकीचा असल्याच्या अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री प्रकाश आंबिडकर हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी रुग्णांशी संवादही साधला. त्यांच्या दौऱ्यामुळे रुग्णालय प्रशासन सावध झाले होते.