शंभर वर्षे जुने निंबाचे झाड कोसळून बसचे मोठे नुकसान,मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : आज दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरातील सुमारे १०० वर्षे जुने कडुनिंबाचे विशाल झाड अचानक कोसळून उभ्या असलेल्या टीजी ०१ झेड ००४१ क्रमांकाच्या आदिलाबाद डेपोच्या बसवर पडले. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जोरदार पावसामुळे उन्मळून पडलेल्या झाडाच्या मोठ्या फांद्या व खोडाचा भाग बसच्या समोरील काचेवर आदळल्याने काच पूर्णपणे फुटली. झाडाचे लाकूड काच फोडून थेट बसच्या आतील भागात घुसल्याने बसचे मोठे नुकसान झाले.
या घटनेमुळे काही काळ मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
झाड रस्त्यावर आडवे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यानंतर स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणांनी झाड हटविण्याचे काम हाती घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालय परिसरात सध्या संरक्षण भिंतीचे (वॉल कंपाऊंड) बांधकाम सुरू असून क्रेनच्या साहाय्याने खोदकाम केले जात आहे. या खोदकामादरम्यान झाडाच्या मुळांना धक्का बसून ती तुटल्यामुळे झाड कमकुवत झाले आणि त्यानंतर जोरदार पावसात ते कोसळले, असा स्थानिक नागरिकांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर परिसरातील जुनी व धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे