भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त भीम आर्मी वर्धातर्फे गरजू नागरिकांना मदतीचा हात
तालुका प्रतिनिधी इरशाद शाह वर्धा
वर्धा वर्धा : १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे औचित्य साधून भीम आर्मी वर्धा जिल्ह्याच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार भाई चंद्रशेखर आझाद (नगिना) यांच्या नेतृत्वाखाली तसेच भीम आर्मी वर्धा जिल्हाध्यक्ष प्रदीपभाऊ कांबळे (रावण) यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील अनाथ, निराधार व बेघर नागरिकांच्या समस्या जाणून घेत मदतीचा हात पुढे करण्यात आला. थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर तसेच उघड्यावर वास्तव्यास असलेल्या गरजू नागरिकांना उबदार ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. उपेक्षित घटकांना आधार देणारा हा उपक्रम समाजात माणुसकीचा संदेश देणारा ठरला.
यावेळी १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईतील शूरवीरांना मानवंदना अर्पण करण्यात आली. सामाजिक समता, न्याय व बंधुतेच्या मूल्यांची जाणीव करून देत नवीन वर्षाची सुरुवात सेवाभावाने करण्यात आली.
या कार्यक्रमाला भीम आर्मी वर्धा जिल्हा संघटक आशिषभाऊ सलोडकर, जिल्हा उपाध्यक्ष बबलू राऊत, जिल्हा महासचिव अलकेश पाणबुडे यांच्यासह सनी खैरे, शुभमभाऊ डूबडूबे, अनुराग डोंगरे, अवि मनवकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचा समारोप “जय भीम, जय शिवराय, जय सेवा” या घोषणांनी उत्साहात करण्यात आला.