वर्धा : पोलीस भरतीची लेखी परीक्षा शांततेत पार; 1711 पैकी 1695 उमेदवार उपस्थित
वर्धा : पोलीस भरतीची लेखी परीक्षा शांततेत पार; 1711 पैकी 1695 उमेदवार उपस्थित
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण
वर्धा जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत घेण्यात आलेली लेखी परीक्षा रविवारी (दि. 15 मार्च) सकाळी 11 ते 12.30 या वेळेत शांततेत व सुरळीतपणे पार पडली. ही परीक्षा सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत असलेल्या फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.
सदर परीक्षेसाठी एकूण 1711 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यामध्ये 1263 पुरुष व 448 महिला उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी 1695 उमेदवार परीक्षेस उपस्थित राहिले, तर 16 उमेदवार अनुपस्थित राहिले.
परीक्षा प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवारांची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात आली. लेखी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी प्रोव्हिजनल उत्तरतालिका जाहीर करण्यात आली.
संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली. नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा शांततेत व पारदर्शकतेने पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.