दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकावर गुन्हा; वाहन जप्त – २२ डुप्लिकेट बुलेट सायलेन्सर जप्त

Wed 11-Mar-2026,04:30 AM IST -07:00
Beach Activities

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकावर गुन्हा; वाहन जप्त – २२ डुप्लिकेट बुलेट सायलेन्सर जप्त

वर्धा | विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण

वर्धा शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेने दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करून त्याचे वाहन जप्त केले असून, मोठ्या आवाजाचे डुप्लिकेट बुलेट सायलेन्सर लावणाऱ्या २२ मोटारसायकलींवरही कारवाई करत सायलेन्सर जप्त केले आहेत.

आज दि. ११ मार्च रोजी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेकडून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार बजाज चौक येथे सकाळी ११ वाजता वाहन तपासणी व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी अक्षय कुळसंगे (वय २४, रा. आनंदनगर, वर्धा) हा मोटारसायकल चालक अतिवेगाने वाहन चालवताना आढळून आला.

वाहतूक अंमलदार एएसआय मुन्ना तिवारी यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून दारूचा वास येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याच्या रक्तात ३३१ एमजी अल्कोहोलचे प्रमाण आढळले. यावरून मोटारसायकल क्रमांक MH 32 AU 8160 चा चालक अक्षय कुळसंगे याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे वाहन जप्त करण्यात आले आहे.

तसेच मोठ्या आवाजाचे बिनापरवाना मॉडिफाईड सायलेन्सर लावून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या २२ बुलेट चालकांवर मोटार वाहन कायदा कलम १९८ व १९४ (एफ) अन्वये कारवाई करण्यात आली असून २२ सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील, एएसआय संजय भांडेकर, एएसआय सय्यद, हवालदार दिलीप कामडी, प्रदीप कोहळे व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

दरम्यान, दारू पिऊन वाहन चालवू नये तसेच मोठ्या आवाजाचे बनावट किंवा मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे.