रेल्वे स्थानकात मानेपासून धड वेगळ्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह:हत्या की आत्महत्या
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
बल्लारपूर : येथील रेल्वे स्थानक परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस चौकी बल्हारशाह येथे मर्ग क्रमांक ०७/२०२६, कलम १९४ भारतीय नागरी सुरक्षा संहिता अंतर्गत नोंद करण्यात आली असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार ७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास बल्हारशाह रेल्वे स्थानकाच्या काजीपेठ बाजूकडे किमी क्रमांक ८९०/३५ जवळ अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी इसमाचा मृतदेह मानेपासून धड वेगळ्या अवस्थेत पडलेला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
सदर मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथील शवगृहात ठेवण्यात आला आहे.
मृतकाची उंची अंदाजे ५.५ फूट असून वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. रंग सावळा, चेहरा लांबट व दाढी-मिशी वाढलेली, बांधा मध्यम, डोक्यावरील केस काळे व वाढलेले आहेत. नाक सरळ व थोडे चपटे आहे. उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत JP असे गोंदलेले आहे. अंगावर जांभळ्या रंगाचा पूर्ण बाहींचा टी-शर्ट व निळ्या रंगाचा लोअर पॅन्ट घातलेला आहे.
सदर तरुणाने आत्महत्या केली आहे की त्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर टाकण्यात आला, याबाबत विविध शक्यता तपासून पाहिल्या जात असून रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या अनोळखी मृत इसमाची ओळख कोणास पटत असल्यास किंवा त्याचे नाव, गाव, पत्ता तसेच वारस किंवा नातेवाईकांविषयी माहिती असल्यास रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा (मो. ७४९९९६७९५७) किंवा तपासी अंमलदार पोलीस हवालदार प्रवीण वन्हेकर (मो. ९८२३४००२३१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.