टाळ-मृदंगानंतर ‘स्व-रक्त पत्र’ आंदोलन; सिंदीकरांची सरकारला भावनिक साद
टाळ-मृदंगानंतर ‘स्व-रक्त पत्र’ आंदोलन; सिंदीकरांची सरकारला भावनिक साद
सिंदी (रेल्वे) वर्धा जिल्हा विशष प्रतिनिधी युसूफ पठाण
सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी नागरिकांनी अनोखे व भावनिक आंदोलन छेडले आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू झालेल्या या जनआंदोलनाने आता तीव्र स्वरूप धारण करत “स्व-रक्त पत्र” मोहिमेचे रूप घेतले आहे. आंदोलनकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पाठविले असून शासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
माहितीनुसार, हे आंदोलन १९, २० व २१ तारखेला तीन दिवस चालणार आहे. आंदोलनादरम्यान सुमारे ५५० नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून शासनापर्यंत आपली मागणी पोहोचविली. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग लाभल्याने आंदोलन अधिक तीव्र आणि भावनिक ठरले आहे.
“ग्रामीण रुग्णालय द्या” या एकमुखी मागणीसाठी सिंदीकरांनी सरकारकडे भावनिक साद घातली आहे. स्थानिकांच्या मते, परिसरात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना उपचारासाठी दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
शासनाने तातडीने निर्णय घेऊन सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.