आधार फाउंडेशनच्या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ; पहिल्याच टप्प्यात २०० वृक्षांचे रोपण
आधार फाउंडेशनच्या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ; पहिल्याच टप्प्यात २०० वृक्षांचे रोपण
हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हिंगणघाटसाठी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
प्रतिनिधि | निखिल ठाकरे हिंगणघाट
हिंगणघाट पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हिंगणघाट घडविण्याच्या उद्देशाने आधार फाउंडेशन, हिंगणघाटच्या वतीने सन २०२६-२७ मधील वृक्षारोपण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकाराम महाराजांच्या विचारांना प्रेरणास्थानी ठेवून राबविण्यात आलेल्या या मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात नंदोरी चौक ते भाक्रा नाला परिसरात तब्बल २०० वृक्षांचे रोपण करण्यात आले.
या मोहिमेत विविध प्रकारची सावली देणारी, फळझाडे तसेच पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि झपाट्याने कमी होत असलेले हरित क्षेत्र लक्षात घेता वृक्षारोपण ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याची गरज आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, पर्यावरणप्रेमी, पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह आधार फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा वृक्षभेट देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये नायब तहसीलदार बल्लावी, ज्येष्ठ समाजसेवक शालिकराव डेहणे, ज्येष्ठ समाजसेविका प्रा. सुरेखा देशमुख, प्राचार्य सुनीता वाणी, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, अभिनव विचार मंचचे नितीन सुकळकर, नारायण सेवा मित्रपरिवारचे महेश अग्रवाल, पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष आशिष भोयर, पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण वैद्य, मंगेश वनिकर, सतीश वखरे, राजेश कोचर, प्रज्वल लिहीतकर, योग शिक्षिका पौर्णिमा धात्रक, वना नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजूरकर, जिवरक्षक फाउंडेशनचे राकेश झाडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डेहणे तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी रवी वानखेडे व संजय नेहारोत्रा यांचा समावेश होता.
यावेळी आधार फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्षा माधुरी विहीरकर यांनी मनोगत व्यक्त करताना प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. केवळ वृक्षारोपण करून थांबणे हा संस्थेचा उद्देश नसून लावलेल्या प्रत्येक रोपाचे योग्य संगोपन करून त्याचे रूपांतर मोठ्या वृक्षात होईपर्यंत त्याची जबाबदारी आधार फाउंडेशन स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग मुडे यांनी केले, तर मयुरी देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. आधार फाउंडेशनची ही वृक्षारोपण मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभर विविध भागांत राबविण्यात येणार आहे. ‘हरित हिंगणघाट’ निर्मितीसाठी नागरिकांनीही या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
या उपक्रमासाठी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले, कार्यकारी अध्यक्षा माधुरी विहीरकर, पराग मुडे, लक्ष्मीकांत धार्मिक, प्रा. डॉ. शरद विहीरकर, सुहास घिनमीने, राजेश कासवा, जगदीश वांदिले, सुनील डांगरे, सुरेश गुंडे, श्याम निमट, मधुकर चाफले, डॉ. गिरीधर काचोळे, प्रा. गजानन जुमडे, पंढरी तडस, गिरीधर कोठेकार, सुभाष शेंडे, विजय धात्रक, सचिन येवले, माया चाफले, विरश्री मुडे, अनिता गुंडे, ज्योती धार्मिक, वैशाली लांजेवार, सुमन डांगरे, शुभांगी वासनिक, इंदिरा तडस, रंजनाताई धोटे, वर्षा डुकरे, वर्षा खिरटकर, वर्षा निरसकर, कुंदा सूर्यवंशी, भारती वेलतुरकर, वैशाली निनावे, जयश्री हरणे, जया महाजन, कल्याणी इटनकर, अपर्णा साठवणे, विजय कुंभारे, रविंद्र कोपरे, गमेसर, रश्मी धायवटकर, मनीषा जांभुळे, राणी सोमवंशी, प्रा. डॉ. रंजन घुबडे, वैशाली कांबळे, मेघराज मुन, ओमप्रकाश मुडे, विकास नागरकर, श्रीकांत डोळसकर, प्रा. चंद्रशेखर रेवतकर, रोकडे सर, युवा समितीचे अध्यक्ष इशांत वांदिले, उपाध्यक्ष गौरव सुरकार, निखिल ठाकरे आदींनी सहकार्य केले.