मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ वसमतमध्ये आठवडाभर आंदोलन

Sun 06-Sep-2026,02:02 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच वसमत येथे आमरण उपोषणाला बसलेले मातंग समाजातील कार्यकर्ते रवीकिरण वाघमारे यांच्या समर्थनार्थ वसमत तालुक्यात संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आठवडाभर विविध आंदोलने करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.

वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय परिसरातील उपोषणस्थळी तालुक्यातील १२ सर्कलमधील सर्वपक्षीय सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत ७ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्कलनिहाय आंदोलन करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले.

रवीकिरण वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वसमत येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला तालुक्यातील विविध समाजघटकांकडून पाठिंबा मिळत आहे. मातंग समाजातील एका बांधवाने मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणे हा सामाजिक ऐक्याचा आदर्श असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

बैठकीनंतर आंदोलनस्थळी “एक मराठा, लाख मराठा,” “जय भारत, जय संविधान,” “जय भीम, जय शिवराय” आणि “जय लहुजी” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठा आरक्षणाचा लढा हा संविधानिक मार्गाने आणि सामाजिक सलोखा कायम ठेवून अधिक व्यापक करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

 

सर्कलनिहाय आंदोलनाचे वेळापत्रक

 

रविवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कवठा आणि खांडेगाव सर्कलमधील सकल मराठा समाज आंदोलनात सहभागी होणार आहे. दि. ८ सप्टेंबर रोजी आसेगाव आणि गिरगाव सर्कल, तर दि. ९ सप्टेंबर रोजी कुरुंदा आणि नगर सर्कलचा सहभाग राहणार आहे.

 

दि. ११ सप्टेंबर रोजी बाभूळगाव आणि टेंभुर्णी सर्कल, दि. १२ सप्टेंबर रोजी पांगरा शिंदे आणि आंबा सर्कल, तर दि. १३ सप्टेंबर रोजी हट्टा आणि करंजाळा सर्कलमधील समाजबांधव आंदोलनात सहभागी होणार आहेत.

 

या कालावधीत वसमत शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा, बैलगाडी मोर्चा, भजन-कीर्तन आंदोलन आणि इतर शांततापूर्ण मार्गांनी मराठा आरक्षणाची मागणी मांडण्यात येणार आहे. सर्व आंदोलने लोकशाही आणि संविधानिक चौकटीत शांततेने पार पाडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

 

मनोज जरांगे पाटील आणि रवीकिरण वाघमारे यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी वसमत तालुक्यातील सकल मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.