पिंपराळा येथील महादेव मंदिराचा रस्ता स्वखर्चातून दुरुस्त
प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत तालुक्यातील पिंपराळा येथील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्यावर खड्डे पडल्याने तसेच मार्ग खराब झाल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने या रस्त्याची समस्या अधिक गंभीर बनली होती.
भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन कौठा सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य. तुषार जाधव पाटील यांनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चातून महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त करून दिला. त्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना तसेच गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पिंपराळा येथील मंदिरात येत असतात. अशा परिस्थितीत रस्त्याची दुरुस्ती झाल्याने भाविकांची होणारी गैरसोय दूर झाली असून, तुषार जाधव पाटील यांच्या या सामाजिक उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
सार्वजनिक समस्यांकडे प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन रस्त्याचे काम करून दिल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी तुषार जाधव पाटील यांचे आभार मानले.
यावेळी उमाजी जोगदंड, गोविंद जाधव, पुंजाजी खराटे, प्रसाद खराटे, रमेश कुबडे, पंचायत समिती सदस्य नंदकिशोर कदम, सोपान कदम, जगन्नाथ कदम, बापूराव कदम, सुशील कुबडे, अविनाश कदम यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या या कामामुळे पिंपराळा परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.