मृत्यूच्या दाढेतून वृद्धाला खेचले बाहेर; RPF आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांचे धाडस!

Fri 30-Oct-2026,11:34 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

मुंबई : अंधेरी येथे धावत्या लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन रेल्वे आणि फलाटाच्या मधील धोकादायक परिस्थितीत अडकलेल्या ७३ वर्षीय वृद्धाचे प्राण RPF जवान उदयवीर सिंह आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान कामरान सिद्दीकी यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. दोन्ही जवानांनी समयसूचकता दाखवत तातडीने बचावकार्य केल्याने संभाव्य दुर्घटना टळली. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून १४ मिनिटांच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

लोकलमध्ये चढताना वृद्धाचा तोल गेला

चंद्रकांत डी. दवे (वय ७३, रा. नालासोपारा पूर्व, जि. पालघर) हे अंधेरी रेल्वे स्थानकावरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये चढत होते. लोकल विरारच्या दिशेने रवाना होत असतानाच अचानक त्यांचा तोल गेला आणि ते रेल्वे व फलाटाच्या मधील धोकादायक परिस्थितीत अडकले. त्यामुळे काही क्षणांतच मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

जवानांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

कर्तव्यावर तैनात असलेले RPF जवान उदयवीर सिंह आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान कामरान सिद्दीकी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दोन्ही जवानांनी धाडसाने आणि शिताफीने वृद्धाला रेल्वे व फलाटाच्या मधून बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली आणि ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचले.

या घटनेत चंद्रकांत दवे यांना दुखापत झाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संकटाच्या वेळी मदतीला धावून आलेल्या दोन्ही जवानांचे दवे यांनी आभार मानले.

झाशी–चौंडी बहिरोबाच्या जवानांच्या धाडसाचे कौतुक

या बचावकार्यातील RPF जवान उदयवीर सिंह हे झाशी येथील, तर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान कामरान सिद्दीकी हे चौंडी बहिरोबा ता वसमत येथील रहिवासी आहेत. मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावताना दोन्ही जवानांनी दाखविलेली समयसूचकता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेमुळे एका ज्येष्ठ नागरिकाला जीवदान मिळाले. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.