बीएसएनएलच्या मोबाईल नेटवर्कमध्ये तातडीने सुधारणा करा

Fri 16-Jan-2026,02:58 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीची मागणी

कारंजा (घा.), ता. प्र.कारंजा शहरात मागील एक ते दीड वर्षांपासून बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क नियमितपणे उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता यादव यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

कारंजा शहरासह आजूबाजूच्या परिसरात अनेकदा बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क पूर्णतः बंद असल्याची स्थिती निर्माण होते. त्यामुळे कॉलिंग, इंटरनेट सेवा तसेच आपत्कालीन संपर्कातही अडथळे येत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

इतर खाजगी दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे दर परवडणारे व ग्राहकांच्या आर्थिक हिताचे असतानाही नेटवर्कच्या सततच्या समस्येमुळे नागरिक बीएसएनएल सेवा बंद करून खाजगी कंपन्यांकडे वळत असल्याचे चित्र आहे.

बीएसएनएलचा टॉवर दीड वर्षांपासून बंद अवस्थेत

कारंजा येथील बीएसएनएल कार्यालय परिसरात उभारलेला मोबाईल टॉवर मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी तुटून पडल्याने त्याची उंची कमी झाली आहे. त्यामुळेच नेटवर्क सेवा विस्कळीत होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

सदर टॉवर तातडीने अद्ययावत करण्यात यावा, नेटवर्क न मिळण्यामागील कारणांचा शोध घेऊन तांत्रिक अडचणी दूर कराव्यात तसेच बीएसएनएल ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.