प्रेमदास मोहोड यांना ‘निवृत्त सेवा पुरस्काराने’ सन्मान
प्रेमदास मोहोड यांना ‘निवृत्त सेवा पुरस्काराने’ सन्मान
(महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशनकडून गौरव)
नावेद पठाण मुख्य संपादक
कारंजा (घाडगे) येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष प्रेमदास पुंडलिकराव मोहोड यांना महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने ‘निवृत्त सेवा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा सन्मान हिंगोली जिल्ह्यातील नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र नरसी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही प्रेमदास मोहोड यांनी आपला मौल्यवान वेळ समाजसेवा व पेन्शनर्स संघटनेच्या कार्यासाठी समर्पित केला आहे. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आदर्श, सक्रिय व प्रेरणादायी ठेवत त्यांनी इतर निवृत्त कर्मचाऱ्यांना संघटनेशी जोडण्याचे व संघटन बळकट करण्याचे मोलाचे कार्य केले आहे. तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
दि. ३ फेब्रुवारी रोजी पेन्शनर्स दिनाचे औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सपत्नीक प्रेमदास मोहोड यांचा निवृत्त सेवा सन्मानाने गौरव करण्यात आला.
प्रेमदास मोहोड हे कारंजा येथील मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष, बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे सचिव तसेच महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशनचे कारंजा तालुका अध्यक्ष आहेत. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेची परंपरा कायम ठेवली असून विशेषतः भारतीय संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. कोणत्याही प्रसंगी संविधानाची प्रत भेट देऊन जनजागृती करण्याचा छंद ते स्वयंस्फूर्तीने जोपासतात. अनेक सामाजिक संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशनकडून निवृत्त सेवा पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल सेवानिवृत्त पेन्शनर्स कर्मचारी, कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती, विविध सामाजिक संघटना तसेच समाजातील विविध घटकांकडून प्रेमदास मोहोड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.