विद्यार्थ्यांची रामन विज्ञान केंद्र, नागपूर येथे शैक्षणिक सहल
विद्यार्थ्यांची रामन विज्ञान केंद्र, नागपूर येथे शैक्षणिक सहल
प्रतिनिधि निखिल ठाकरे
हिंगणघाट : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या पुढाकारातून वर्धा जिल्ह्यातील तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांना नागपूर येथील रामन विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी मिळाली.
या सहलीसाठी वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. एकूण २०० विद्यार्थी व ४० शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. दि. २४ मार्च २०२६ रोजी ही सहल पार पडली.
वर्धा तालुक्यातून २५ सर्जनशील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यासाठी विस्तार अधिकारी माया चाफले, संपर्क प्रमुख केंद्रप्रमुख राजेंद्र इंगोले, करुणा शंभरकर तसेच शिक्षिका नीता हांडे, कल्पना डफ आणि रवींद्र सातोकर यांची निवड करण्यात आली. डायटचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्ध्याचे गटविकास अधिकारी समर्थ शंकरराव शेवाळे, गटशिक्षणाधिकारी धर्मराज कुमरे, अधिव्याख्याता डॉ. उर्मिला हाडेकर, विस्तार अधिकारी मीनाक्षी देवतळे तसेच पालक उपस्थित होते.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष अनुभवातून सखोल माहिती मिळाली. विविध प्रयोग, मॉडेल्स आणि विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा अधिक वाढली.
यासोबतच विद्यार्थ्यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्थेलाही भेट दिली. येथे संचालक राजकुमार अवसरे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नीतू गावंडे व अधिव्याख्याता डॉ. हेमा बांबल यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून त्यांच्या वैज्ञानिक शब्दसंपदेत व ज्ञानात वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.