महिला शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा : वडेट्टीवार

Thu 08-Oct-2026,05:29 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले, हिंगोली

हिंगोली : महाराष्ट्र १९७२ नंतरच्या सर्वांत भीषण दुष्काळी संकटाला सामोरे जात असून, मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तलावांमध्ये पाणी नाही, विहिरी कोरड्या पडल्या आहेत आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्याचेही गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ जीआर काढून शेतकऱ्यांची फसवणूक न करता तातडीने हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, १९७२ च्या दुष्काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत मदत केली होती. मात्र, आजचा कोरडा दुष्काळ त्याहून गंभीर आहे. अल निनोच्या परिणामाची माहिती सरकारला आधीपासून असतानाही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. सरकारने शेतकरी संकटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी केला.

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जात असून, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात मागील २० दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यात एका महिला शेतकऱ्याचाही समावेश आहे. ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जपुनर्गठन हा कायमस्वरूपी उपाय नसून भविष्यात शेतकऱ्याला ते कर्ज फेडावेच लागणार आहे. त्यामुळे कर्जपुनर्गठन न करता सरसकट सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

दुष्काळी संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढायचे असेल तर सरकारने अनावश्यक मोठे प्रकल्प आणि खर्च थांबवून तो निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध करून द्यावा. शक्तिपीठ महामार्ग रद्द करून त्यासाठीचा पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा. कुंभमेळ्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी वडेट्टीवार यांना चटणी-भाकरी दिली. मंत्र्यांना काजू-बदाम दिले जातात; मात्र शेतकऱ्यांनी दिलेली भाकरी वडेट्टीवार यांनी स्वीकारली. शक्तिपीठ महामार्गाविरोधात सभागृहात आवाज उठवू आणि गरज पडल्यास रस्त्यावरही आंदोलन उभे करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना शेतात जाऊ न देता मोजणी सुरू असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या मागणीला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना सरकारच्या हाताला लकवा मारतो का? उद्योगपतींची कर्जे माफ होतात, मग कष्टकरी शेतकऱ्याला कर्जमाफी का नाही?’ असा सवाल करत शेतकरी जगला तरच देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत राहील, असे वडेट्टीवार यांनी सुनावले.

हिंगोली जिल्ह्यात तब्बल सहा तास लोडशेडिंग सुरू असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. हिंगोलीत सहा आमदार आणि दोन खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. मग जनतेच्या प्रश्नांसाठी हे लोकप्रतिनिधी काय करत आहेत? हिंगोलीला वाली कोण? जनतेने एकदा या लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

हिंगोलीमध्ये घडलेल्या स्फोटाच्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, जखमींच्या कुटुंबीयांचीही वडेट्टीवार यांनी भेट घेतली. या दुःखद घटनेबद्दल संवेदना व्यक्त करत पीडित कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.