समृद्धी महामार्गावरील अपघातातील फरार ट्रेलर चालकास वर्धा पोलिसांची अटक

Fri 02-Jan-2026,07:20 AM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधि युसुफ पठान 

वर्धा:वर्धा समृद्धी महामार्गावर झालेल्या जीवघेण्या अपघातातील फरार ट्रेलर चालकाचा शोध घेण्यात वर्धा पोलिसांना यश आले आहे. कोणतीही प्रत्यक्षदर्शी साक्ष किंवा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही, तब्बल १३०० वाहनांची तपासणी करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजताच्या सुमारास येळाकेळी पेट्रोल पंपाजवळ (वर्धा रोड) आयशर टेम्पो (क्र. MH 12 PQ 1220) ला अज्ञात कंटेनर/ट्रेलरने जोरदार धडक दिली होती. या अपघातात आयशर चालक लखन चंद्रकांत काळुंके (वय २२, रा. पुणे) यांचा मृत्यू झाला, तर इस्माईल इक्बाल सैदुवाले (वय २५) हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात अपराध क्र. ८९०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

पोलीस उपनिरीक्षक संदीप साबळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करत समृद्धी महामार्गावरील १३०० वाहनांची सखोल तपासणी केली. त्यानंतर अपघातातील ट्रेलर क्रमांक MH 40 BG 8867 असल्याचे निष्पन्न झाले.

या आधारे आरोपी चालक शामकिशोर मुरलीप्रसाद पांडे (वय ४२, रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश; सध्या रा. महालगाव, नागपूर) यास १ जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.