प्रभाग २० मधील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था; तात्काळ दुरुस्ती व बालमंदिरासाठी सुसज्ज इमारतीची मागणी
प्रभाग २० मधील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था; तात्काळ दुरुस्ती व बालमंदिरासाठी सुसज्ज इमारतीची मागणी
नावेद पठाण मुख्य संपादक
प्रभाग क्रमांक २० परिसरातील सार्वजनिक सुलभ शौचालयांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेचा अभाव, पाण्याची टंचाई तसेच तुटलेल्या सुविधा यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अंकुश हेमंत मुंजेवार तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. १३ फेब्रुवारी २०२६) वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. सुधीरभाऊ पागुल यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शौचालयांची तात्काळ दुरुस्ती करून नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू करण्याची नम्र मागणी करण्यात आली.
यासोबतच परिसरातील लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालमंदिरासाठी नवीन, सुसज्ज व सुरक्षित इमारत उभारण्याचीही मागणी करण्यात आली. दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (पुणे शहर) अध्यक्ष निलेश केवट, शिल्पकार असंघटित कामगार संघटना अध्यक्ष प्रशांत वासनिक, ज्ञानेश्वर रामटेके, अनिल भोंगाडे, सूरज धवणे, सिद्धार्थ गजभिये, अनिकेत महेस्कर, आशितोष मारतोडे तसेच प्रभाग क्रमांक २० मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.