केंद्रीय विद्यालय वर्धा विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत चमक; पाच खेळाडू राष्ट्रीय स्तरासाठी निवडले
केंद्रीय विद्यालय वर्धा विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत चमक; पाच खेळाडू राष्ट्रीय स्तरासाठी निवडले
प्रतिनिधी : युसूफ पठाण | वर्धा
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ परिसरातील केंद्रीय विद्यालय वर्धा येथील विद्यार्थ्यांनी ५५ व्या केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) मुंबई संभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई करत उत्कृष्ट कामगिरी केली.
ही स्पर्धा दि. २० ते २२ एप्रिल, २३ ते २५ एप्रिल तसेच २७ ते २९ एप्रिलदरम्यान मुंबई संभागातील विविध केंद्रीय विद्यालयांमध्ये पार पडली. स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, बुद्धिबळ, तायक्वांदो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, क्रिकेट आणि कबड्डी या विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय यश मिळविले.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, त्यामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य यतेंद्र कुमार यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला, शारीरिक शिक्षण शिक्षक अमरेश कुमार शुक्ल यांच्या मार्गदर्शनाला तसेच पालकांच्या सहकार्याला देण्यात आले.
या यशामध्ये शिक्षक सुरेंद्र खोंडे, संजय वाघमारे, धीरज पेटकर, वंदना शर्मा, कुलदीप कुमार, गणेश वानखेडे, अरुण कुमार, मदन गवई, रमेश ओझा, तृप्ती शेळके, पूजा ठाकूर, आसावरी कपिल, नीलिमा अरसड, शीलवंश धूल आणि नंदीश्वर तिवारी यांच्यासह संपूर्ण शिक्षक व कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभले.
यशस्वी खेळाडूंमध्ये अधिराज, रिदान, निधी, केशवी, देवांश, यथार्थ, श्रेयश, जयेश, रुद्रांश, पार्थ, अर्णव आणि वीर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.