पत्ता गोदाम चौकात ट्रकची स्कूटी ला धडक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

Tue 04-Aug-2026,05:10 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: शहरातील पत्ता गोदाम चौकात मंगळवारी ३ ऑगस्ट दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ट्रकने स्कूटीला मागून जोरदार धडक दिल्याने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीस आरती राजेंद्र आकेवार ५३ वर्ष, रा. गोरक्षण वॉर्ड, बल्लारपूर) या किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळल्याने गंभीर दुर्घटना थोडक्यात टळली.

माहितीनुसार, ट्रक क्रमांक एमएच-४० बीएल-८१६६ ने स्कूटी क्रमांक एमएच-३४ एएल-६१०८ ला मागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे आरती आकेवार या रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्या बँकेतील काम आटोपून घरी परतत असताना हा अपघात घडला.

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ड्युटी ऑफिसर सहाय्यक फौजदार गजानन डोईफोडे व पोलीस हवालदार संदेश वाघमारे यांनी जखमी आरती आकेवार यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघातामुळे काही काळ विस्कळीत झालेली मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भाजपचे ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल यांनी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे धाव घेत जखमी आरती आकेवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून जखमींवर तातडीने व योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १२५(अ), ३२४(२) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

पत्ता गोदाम चौक हा शहरातील अत्यंत अरुंद व वर्दळीचा मार्ग असून याच मार्गावरून गौरक्षण वॉर्ड तसेच दोन शाळा आणि महाविद्यालयाकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे या चौकात वारंवार अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार असून रस्त्याचे रुंदीकरण, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.