बेटी बचाओ, बेटी पढाओ जनजागृती कार्यक्रमातून बाल संरक्षणाचा संदेश

Fri 31-Jul-2026,11:34 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने २९ जुलै २०२६ रोजी भवानजीबाई हायस्कूल सभागृह, चंद्रपूर येथे बेटी बचाओ, बेटी पढाओ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात बालकांचे संरक्षण, मुलींचे शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच बालहक्कांविषयी अंगणवाडी सेविकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. क्षमा बासरकर, समितीच्या सदस्या डॉ. ज्योत्स्ना मोहितकर, परिवेक्षा अधिकारी सायली मॅडम, परिवेक्षा अधिकारी आशिष चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर तसेच जिल्हा समन्वयक, चाईल्ड हेल्पलाईन अभिषेक मोहुर्ले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी मान्यवरांनी गुड टच-बेंड टच, बाल संरक्षणामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका, बाल सुरक्षा समित्यांचे कार्य, बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत विविध समित्या व त्यातील अधिकाऱ्यांची जबाबदारी, तसेच संकटग्रस्त बालकांसाठी कार्यरत असलेल्या चाईल्ड हेल्पलाईन १०९८ विषयी सविस्तर माहिती दिली. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच बालकांच्या सुरक्षिततेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.या जनजागृती कार्यक्रमात वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर, शक्तीसदन/स्वधार, चाईल्ड हेल्पलाईन तसेच महिला व बाल विकास विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ परिवेक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे यांनी केले. सूत्रसंचालन पपिया महाकाळकर यांनी केले, तर भास्कर ठाकूर, रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन सुपरवायझर यांनी आभार मानले.कार्यक्रमास चंद्रपूर शहरातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. उपस्थितांनी बाल संरक्षण व मुलींच्या शिक्षणासंदर्भातील विविध विषयांवरील मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकाश बांदकर व वरिष्ठ परिवेक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे उपस्थित होते.