मॉन्टफोर्ट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत : आनंदमय वातावरणात शैक्षणिक वर्षाची सुरुवात

Fri 03-Jul-2026,04:59 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : बामणी येथील मॉन्टफोर्ट स्कूलमध्ये नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता दिसून आली. शाळेच्या परिसरात दिवसभर उत्सवी वातावरण अनुभवायला मिळाले.शाळेचा परिसर फुगे, फुले आणि आकर्षक चित्रांनी सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी प्राचार्य, उपप्राचार्य तसेच शिक्षक-शिक्षिका प्रवेशद्वारावर उपस्थित होते. अनेक लहान मुले पालकांचा हात धरून शाळेत आली होती. मात्र, शाळेतील आकर्षक सजावट आणि आनंदी वातावरण पाहून त्यांच्या मनातील भीती दूर झाली.यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नन्हे कदम बढ़े चलो, सूरज सा चमको या स्वागत गीताच्या सुरावटींनी वातावरण भारावून गेले.शिक्षक-शिक्षिकांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्य करत त्यांचा उत्साह वाढविला.

प्राचार्य ब्रदर प्रेम कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शाळेचा पहिला दिवस हा केवळ शिक्षणाचा प्रारंभनसून नव्या आशा, नव्या संधी आणि नव्या स्वप्नांचा आरंभ आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल भीती नव्हे तर आनंद आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी अशा उपक्रमांचे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना स्वागत बॅज देण्यात आले. तसेच वर्षभर खेळ, संगीत, नृत्य, संशोधनात्मक उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा समतोल राखून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि रंगीत पेन्सिल संच भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा पहिला शालेय दिवस आनंद, उत्साह आणि नव्या उमेदीने साजरा झाला.