चित्रकलेतून जीवनशैली, आस्था व विचारांचे प्रतिबिंब उमटते – मोहन अग्रवाल
नावेद पठाण मुख्य संपादक
बोरगाव मेघे : चित्रकला ही एक सुंदर व सर्जनशील कला असून रंग, आकार आणि भावनांच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याचे सामर्थ्य ती देते. निसर्ग, व्यक्ती वा विविध विचार कागदावर साकारताना विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते आणि आनंद मिळतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक मोहन बाबू अग्रवाल यांनी केले. ते सेंट थॉमस इंग्लिश स्कूल, बोरगाव मेघे यांच्या वतीने सत्येश्वर हॉल येथे आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या समारंभाचे उद्घाटन ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या प्रीती सत्याम, संचालक विजय सत्याम, साध्वी सत्यमित्रा, आदर्श शिक्षक मोहन मोहिते, उपमुख्याध्यापिका वर्षा देशपांडे, वेदांत सत्याम, संदीप जोशी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना इमरान राही म्हणाले की, चित्रकला ही मानवाने निर्माण केलेली एक सुंदर कला असून रंगांच्या माध्यमातून भावना व विचारांना वास्तवाचा आकार देण्याचे कार्य ती करते. कार्यक्रमाची भूमिका मांडताना प्राचार्या प्रीती सत्याम यांनी सांगितले की, चित्रकलेद्वारे आपण शब्दांशिवायही आपल्या भावना, विचार आणि कल्पना प्रभावीपणे मांडू शकतो.
वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत संत गाडगे बाबांची सुंदर चित्रे साकारली. स्पर्धेत आदित्य साटोने, आदेश तागडे, आराध्या पंडित यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर तनुजा आवारी, ललिन नेवारे, स्वरांगी डंबाले यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा डफले, सनोबर काझी व शबाना खान यांनी केले. सक्षम निर्वाण यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी रुपाली खरकाडे, चैताली बारई, संचाली भलमे, श्रद्धा संत यांची उपस्थिती होती.