तणावरहीत जीवनासाठी आदर्श दिनचर्या व जीवनशैली आवश्यक : डॉ. भूषणकुमार उपाध्याय

नावेद पठाण मुख्य संपादक
श्यामसुंदर अग्रवाल व्याख्यानमाला संपन्न
वर्धा:वर्धा देवळी आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात तणाव पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी तणावाशी सामना करण्याची क्षमता वाढवणे नक्कीच शक्य आहे. नियमित सराव, सकारात्मक दृष्टीकोन आणि आदर्श दिनचर्या यामुळे तणावरहीत जीवन जगता येते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.
ते २० सप्टेंबर रोजी श्यामसुंदर मन्नालाल अग्रवाल धर्मशाळेच्या सभागृहात आयोजित स्व. श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमालेत “तणावरहीत जीवन कसे जगावे” या विषयावर मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.
डॉ. उपाध्याय म्हणाले की, दररोज ध्यान, योगासने, प्राणायामाचा सराव, पुरेशी झोप, संतुलित आहार, वेळेचे नियोजन आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे या सवयी अंगीकारल्यास मानसिक आरोग्य सुधारते. कुटुंब-मैत्रांसोबत वेळ घालवणे, छंद जोपासणे, कामाचे प्राधान्य ठरवणे या गोष्टी तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त ठरतात.
या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे माजी पोलीस उपअधिक्षक चंद्रकांत उदगीकर, ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबू अग्रवाल, डॉ. गणेश मालधुरे मंचावर उपस्थित होते.
रामदास तडस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवनात ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करणे, सकारात्मक दृष्टी ठेवणे आणि इतरांशी आदरपूर्वक वागणे हे गुण यशस्वी जीवनासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते देवळी शहरातील शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमती गायत्रीदेवी मोहनलाल अग्रवाल स्मृती पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही यांनी करून दिला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहनबाबू अग्रवाल यांनी मानले. राहुल चोपडा यांनी स्व. श्यामसुंदरजी अग्रवाल यांच्या जीवनाबाबत माहिती देत श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी प्रदीप दाते, मुरलीधर बेलखोडे, विजय सत्यम, मोहन मोहिते, मोहन गुजकर, विजय नाखले, जब्बार तंवर, सुरेश वैध, डॉ. मदनकर, महेश मोकळकर, नंदू वैध, सुधाकर सुरकार, राजू लभाणे, शरदराव नाईक, चेतन अग्रवाल, रेखा पारेख, दिपक सेठीया, पोलीस निरीक्षक अमोल मांडालकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. कुंवारे, डॉ. मालधुरे, दिनेश अग्रवाल, प्रकाश कांकरिया, मोहन जोशी, गोल्डी बग्गा, बालकृष्ण हांडे, डॉ. राजश्री देशमुख, नरेश अग्रवाल, भरत अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले.