शिवजयंतीनिमित्त रक्तदान; नरेंद्र घोडमारे यांचे २३वे रक्तदान
शिवजयंतीनिमित्त रक्तदान; नरेंद्र घोडमारे यांचे २३वे रक्तदान
वर्धा जिल्हा विशष प्रतिनिधि युसूफ पठाण
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र घोडमारे यांनी २३व्यांदा रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले.
‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश कृतीतून देत वरुड (रेल्वे) व सेवाग्राम परिसरात सक्रिय असलेल्या घोडमारे यांनी सातत्याने रुग्णसेवा व सामाजिक कार्याचा वसा जपला आहे.
शिवजयंतीनिमित्त द हेलपिंग हॅन्ड फॅमिली, वरुड (रेल्वे) यांच्या वतीने शिवाजी चौक येथे आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी होत त्यांनी आपले २३वे रक्तदान पूर्ण केले.
नरेंद्र घोडमारे हे केवळ रक्तदानापुरते मर्यादित नसून सेवाग्राम रुग्णालयात येणाऱ्या गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मदतीचा हात म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय मदत, औषधोपचार तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देत ते रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आधार देतात.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “माणुसकीच्या नात्याने एकमेकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. रक्ताच्या एका थेंबामुळे एखाद्याचे प्राण वाचत असतील, तर ते माझे भाग्य आहे.”
या उपक्रमाचे वरुड, सेवाग्राम व परिसरातील नागरिक, सामाजिक संघटना आणि मान्यवरांनी कौतुक करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.