शिवजयंतीनिमित्त काचनगाव शाळेला भव्य प्रवेशद्वार भेट
शिवजयंतीनिमित्त काचनगाव शाळेला भव्य प्रवेशद्वार भेट
अल्लीपूर | प्रतिनिधी – सुनील हिंगे
हिंगणघाट तालुक्यातील काचनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला सुमारे २२ हजार रुपये किमतीचे लोखंडी स्लाइडिंग प्रवेशद्वार भेट देण्यात आले. अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबविण्याचा आदर्श मंडळाने यंदा घालून दिला.
दरवर्षीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करताना यावर्षी बँड, डीजे आदींवर खर्च न करता तो निधी शाळेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रमंडळातील सदस्यांनी वर्गणी गोळा करून प्रवेशद्वारासाठी निधी संकलित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.
दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, काचनगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश कापसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी ज्ञानआकलन स्पर्धा व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणराव डफ, सतीश कापसे व इतर मान्यवरांच्या हस्ते नव्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमानंतर मित्र मंडळातर्फे अल्पोपहार देण्यात आला.
या कार्यक्रमाला लक्ष्मणराव डफ, नामदेवराव हिंगे, हनुमान आष्टनकर, योगेश माहुरे, तुळशीराम आष्टनकर, विजय ढगे, मंगेश खोडे, साहिल खोडे, अभिमन्यू आष्टनकर, ऋषिकेश चिंचोलकर, अमोल गोटे तसेच इतर सदस्य उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक कुरटकर सर, मोघे सर, मांढरे सर, धुर्वे सर, काकडे सर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काचनगावप्रमाणे इतर गावांनीही सामाजिक जाणीव ठेवून असे विधायक उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.