वर्ध्यात बांधकाम कामगार योजनांत मोठा घोटाळा? ऑनलाईन केंद्रांकडून अवैध वसुलीचे आरोप; भीम आर्मीची चौकशीची मागणी

Tue 17-Feb-2026,05:43 AM IST -07:00
Beach Activities

वर्ध्यात बांधकाम कामगार योजनांत मोठा घोटाळा?ऑनलाईन केंद्रांकडून अवैध वसुलीचे आरोप; भीम आर्मीची चौकशीची मागणी

वर्धा तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा

 

वर्धा : शहरासह परिसरात बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना, शिष्यवृत्ती व आर्थिक सहाय्य योजनांमध्ये गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप पुढे आला आहे. ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या काही खाजगी सेवा केंद्रे व दलालांकडून लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अवैध आर्थिक वसुली होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या प्रकरणी भीम आर्मीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून सखोल चौकशी व फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही केंद्रांमार्फत मंजूर होणाऱ्या अनुदान किंवा शिष्यवृत्तीच्या रकमेपैकी तब्बल २० ते ३० टक्के रक्कम बेकायदेशीररीत्या वसूल केली जात असल्याचे आरोप आहेत. तसेच अवैध रक्कम देण्यास नकार देणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज मुद्दाम प्रलंबित ठेवणे, लाभ रोखणे किंवा महिला लाभार्थ्यांना शासकीय नोंदीत “मृत” दाखविण्यासारखे धक्कादायक प्रकारही घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हा प्रकार फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे, शासकीय अभिलेखात फेरफार व आर्थिक अपहार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत मोडणारा असून सार्वजनिक हिताला बाधा पोहोचवणारा असल्याचे भीम आर्मीचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित ऑनलाईन सेवा केंद्रे, बांधकाम कामगार कार्यालय व मध्यस्थ यांची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दोषी आढळणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पारदर्शक ऑनलाईन निरीक्षण प्रणाली सुरू करावी तसेच बाधित लाभार्थ्यांच्या प्रकरणांचा पुनर्विलोकन आदेश द्यावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास संविधानिक व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या वेळी भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कांबळे (रावण) यांच्यासह अमोल शंभरकर, आदर्श वाघमारे, समीर नाईक व अमोल तामगाडगे उपस्थित होते.