प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्ध्यात हेल्मेट रॅली; वाहतूक नियमांबाबत जनजागृती

Mon 26-Jan-2026,06:04 AM IST -07:00
Beach Activities

प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्ध्यात हेल्मेट रॅली; वाहतूक नियमांबाबत जनजागृती

वर्धा | जिल्हा विशष प्रतिनिधी युसूफ पठाण

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे व रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने वाहतूक नियंत्रण शाखा व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या रॅलीमध्ये नागरिक व वाहनचालकांना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, मद्यपान करून वाहन न चालवणे तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, अशा महत्त्वपूर्ण संदेशांद्वारे जनजागृती करण्यात आली. यासाठी पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमचा प्रभावी वापर करण्यात आला.

या रॅलीला अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (Dy RTO) स्नेहा मेंढे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी RTO निरीक्षक अनुराधा जाधव, इंद्रजित मदने यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच स्कूल बस चालक, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना यांनी मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभाग नोंदविला. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील व पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड यांनी रॅलीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ही हेल्मेट रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून सुरू होऊन बजाज चौक, शिवाजी महाराज पुतळा चौक, आर्वी नाका चौक, धुनिवाले मठ, आरती चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे समारोप करण्यात आला.

सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही रॅली दुपारी १२ वाजता यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत सकारात्मक जनजागृती झाल्याचे चित्र दिसून आले.