वर्धा पोलिसांचा रस्ता सुरक्षेसाठी मोठा संदेश “हेल्मेट घाला, जीवन वाचवा
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधि युसुफ पठाण
वर्धा:वर्धा पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वर्धा शहरात हेल्मेट जनजागृती दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली आज सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.
या जनजागृती रॅलीचा मुख्य उद्देश दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व, सुरक्षित वाहनचालना बाबत जनजागृती करणे तसेच रस्ता अपघातांना आळा घालणे हा होता.
या रॅलीत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी स्वतः सहभाग नोंदवून नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
ही मोटारसायकल रॅली पोलीस मुख्यालयातून सुरू होऊन पोस्ट ऑफिस चौक, बजाज चौक, शास्त्री चौक, बॅचलर रोड, आर्वी नाका, धुणीवाले मठ चौक, आरती चौक, शिवाजी चौक, वंदना चौक, झेंडा चौक, अंबिका चौक, इतवारा चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पुन्हा पोलीस मुख्यालयात येऊन समाप्त झाली.
रॅलीदरम्यान पोस्टर्स, बॅनर्स तसेच पब्लिक अॅड्रेस सिस्टिमच्या माध्यमातून वाहनचालकांना —
हेल्मेट घालणे बंधनकारक आहे,
वेगात वाहन चालवू नये,
मद्यपान करून वाहन चालवू नये,
व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे,
असे आवाहन करण्यात आले.
शिवाजी चौकात नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन रॅलीचे स्वागत केले व वर्धा पोलिसांच्या या जनहितकारी उपक्रमाचे कौतुक केले.
या रॅलीचे यशस्वी आयोजन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, सहायक फौजदार मंगेश येळणे, रियाज खान, दिलीप आंबटकर, पोलीस हवालदार किशोर पाटील तसेच वाहतूक पोलीस व होमगार्ड जवानांनी केले.
रस्ता अपघात रोखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वर्धा पोलिसांचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, नागरिकांनी नियमितपणे हेल्मेटचा वापर करून सुरक्षित वाहनचालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.