सिंदी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालयासाठी रक्तपत्र आंदोलन; खासदार अमर काळे व अतुल वांदिले यांचा पाठिंबा
सिंदी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालयासाठी रक्तपत्र आंदोलन; खासदार अमर काळे व अतुल वांदिले यांचा पाठिंबा
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण
सिंदी रेल्वे — येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत खासदार अमर काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून राज्य सरकारचे लक्ष वेधले.
सिंदी रेल्वे परिसरातील नागरिकांनी १४०० हून अधिक रक्तपत्रे लिहून ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याचा निर्धार केला आहे. “आमच्या जीवाशी खेळ थांबवा, ग्रामीण रुग्णालय द्या,” असा संदेश या रक्तपत्रांतून देण्यात आला आहे.
यापूर्वी टाळ-मृदंगाच्या गजरात आंदोलन, निवेदने व पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. अखेर संतप्त सिंदीकरांनी रक्ताने पत्र लिहून थेट मुख्यमंत्रीांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात सर्व धर्म, समाज व पक्षांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सिंदीसह परिसरातील सुमारे २५ गावांचा आरोग्य प्रश्न सोडवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तातडीने ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा अतुल वांदिले यांनी दिला.
या आंदोलनात अमोल सोनटक्के मित्रपरिवार, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, नगरसेवक आशिष देवतळे, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, गटनेते अजय कलोडे, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, सचिव धनराज झिलपे, बंटी बेलखोडे, युगल अवचट यांच्यासह सिंदी रेल्वे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.