भव्य मिरवणुकीने शिवजयंती उत्सव ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू, शिवमित्र परिवाराचे आयोजन
भव्य मिरवणुकीने शिवजयंती उत्सव ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू, शिवमित्र परिवाराचे आयोजन
नावेद पठाण मुख्य संपादक
कारंजा (घाडगे) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कारंजा शहर व परिसरात उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी पारंपरिक वेशभूषेतील मावळे, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळपासूनच शहरातील शाळा, महाविद्यालये व विविध आस्थापनांमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शिवमित्र परिवाराची झांकी व भव्य मिरवणूक
न्यायालयलगतच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवमित्र परिवार, मान्यवर नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सायंकाळी ५ वाजता ढोल-ताशांच्या गजरात झांकी व रॅलीला सुरुवात झाली. उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या मिरवणुकीत शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वैभव विनोद केवटे, बाल शिवाजीच्या भूमिकेत शिवांश मनोज वानखेडे तर जिजाऊंच्या भूमिकेत तनश्री राऊत यांनी साकारलेली वेशभूषा विशेष लक्षवेधी ठरली.
मिरवणुकीदरम्यान जय बेलखडे यांनी सहभागी शिवभक्तांसाठी फ्रुटी व पाण्याची व्यवस्था केली होती. शिवमित्र परिवाराचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला, युवक व बालकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
बाल शिवाजींच्या वेशातील लहान मुलांच्या सहभागामुळे आणि ढोल-ताशांच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणुकीचा मार्ग पंचायत समिती चौक, गोळीबार चौक ते जयस्तंभ चौक असा होता. सायंकाळी उशिरापर्यंत शिवगर्जनेने परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीची सांगता जयस्तंभ चौक येथे करण्यात आली.
शिवजयंतीचे औचित्य साधून समर्थ दादाजी महाराज देवस्थान संस्थान, कारंजा व मराठा सेवा संघ यांच्या वतीने २२ तारखेपर्यंत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.