पोलीस मुख्यालयात विदर्भस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचा दिमाखदार समारोप
वर्धा | जिल्हा विशष प्रतिनिधी : युसूफ पठाण
पोलीस कर्मचारी संस्था व पोलीस बॉयज क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ ते १८ जानेवारी दरम्यान वर्धा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विदर्भस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आर. के. शर्मा (एच.आर. हेड, एव्हनिथ स्टील), श्री. विनोद चौधरी (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा) तसेच श्री. मजीद बशीर शेख (राखीव पोलीस निरीक्षक, वर्धा) उपस्थित होते.
या स्पर्धेत वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, नांदेड व पुलगाव येथील एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. या सामन्यात डी.सी.सी. अमरावती संघाने व्हिजन स्पोर्ट्स नागपूर संघावर ९१–७९ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. तर नेक्सस अकॅडमी नांदेड संघाने हूपर्स नागपूर संघावर मात करत तृतीय क्रमांक मिळवला.
विजेत्या, उपविजेत्या व तृतीय क्रमांकाच्या संघांना आयोजकांच्या वतीने आकर्षक चषक व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. बक्षीस वितरण समारंभ अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. शत्रुघ्न गोखले तसेच महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेचे श्री. जयंत देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली.
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निखिल ढोंगे यांनी विकसित केलेल्या डिजिटल स्कोअर बोर्ड व डिजिटल स्कोअरशीटचा प्रथमच यशस्वी वापर करण्यात आला. या उपक्रमाचे खेळाडू व प्रेक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
ही विदर्भस्तरीय स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राजेश उमरे, राकेश महेश्वरी, प्रशांत काळे, नितीन नेटके, किशोर पाटील यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.