भरत नागपाल हत्याकांडाची सीआयडी चौकशी करा – आमदार राजेश बकाने यांची विधानसभेत मागणी

Thu 05-Mar-2026,04:50 AM IST -07:00
Beach Activities

भरत नागपाल हत्याकांडाची सीआयडी चौकशी करा – आमदार राजेश बकाने यांची विधानसभेत मागणी

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण

पुलगाव-देवळी मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेत भरत नागपाल हत्याकांड प्रकरणी सीआयडी चौकशीची जोरदार मागणी केली. सभापतीसमोर हा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे महामंत्री भरत नागपाल यांना रेती घाटावर बोलावून सुनियोजित कट रचत त्यांची हत्या करण्यात आली.

आमदार बकाने यांनी आरोप केला की, हल्लेखोरांनी रेती घाटाबाहेर जाण्याचा मार्ग वाहनांनी अडवून ठेवला होता. सुमारे २० जणांच्या गटाने निःशस्त्र भरत नागपाल यांच्यावर निर्दयी मारहाण केली. गंभीर मारहाणीनंतर त्यांना नदीपात्रात फेकण्यात आले आणि पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी केला.

तसेच, पोलिस प्रशासनाने आरोपींची संख्या कमी दाखविल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, २० संशयितांपैकी केवळ १४ जणांना आरोपी करण्यात आले असून त्यापैकी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी यासाठी सरकारने तात्काळ सीआयडी चौकशी जाहीर करावी, अशी मागणी आमदार बकाने यांनी सभागृहात केली. तसेच महसूल विभागाने रेती घाटांचे योग्य सीमांकन केल्यास भविष्यात अशा घटना टाळता येऊ शकतात, असेही त्यांनी सूचित केले.

न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने त्वरीत आणि ठोस पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका आमदार बकाने यांनी व्यक्त केली.