अल्लीपूर येथे रंगाविना आदर्श होळी-धुलीवंदन उत्साहात संपन्न
अल्लीपूर येथे रंगाविना आदर्श होळी-धुलीवंदन उत्साहात संपन्न
अल्लीपूर (ता. हिंगणघाट) | प्रतिनिधी – सुनील हिंगे
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून रंगाविना होळी व आदर्श धुलीवंदन साजरे करण्याची परंपरा कायम राखली जात आहे. यावर्षीही अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
सध्या टीव्ही व चित्रपटांच्या प्रभावामुळे पारंपरिक संस्कृती बाजूला पडून होळी, शिमगा व धुलीवंदनाच्या नावाखाली धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अल्लीपूर येथे आदर्श पद्धतीने, कोणताही रंग न वापरता आणि व्यसनमुक्तीचा संदेश देत होळी साजरी करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘ग्रामगीता’च्या २३ व्या अध्यायात आदर्श होळी व शिमगा कसा साजरा करावा याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्याच विचारांनी प्रेरित होऊन गावात रामधून व प्रभातफेरी काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गांवरून सकाळच्या वेळी गुरुदेव भक्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रामधून सोहळा उत्साहात पार पडला.
समारोप कार्यक्रमात प्रास्ताविक श्रीराम साखरकर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन कैलास बाळबुदे, योगेश वरभे, परेश सावरकर, डॉ. वसंत हिंगे, गणेश ढगे, मोहन लिचडे व ज्ञानदास ढगे महाराज यांनी केले. आभार प्रदर्शन संदीप येनगडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरविंद साखरकर, प्रवीण देशमुख, प्रीतम वरघने, गिरीश वरघने, शंकर देशमुख, राम प्यारा कांबडी, वसंत मुजबैले, दिनेश कलोडे, दिनेश लिचडे, श्रीकृष्ण ढगे, अरुण वंजारी, पद्माकर सुरकार, दादाराव पिसे, वासुदेवराव देशमुख, नारायणराव डफ, रामदासजी मुडे, गुलाबराव ढगे आदी गुरुदेव भक्तांनी सहकार्य केले.