लादेन नगर येथील विस्थापितांना तात्काळ पुनर्वसन द्या; अन्यथा तीव्र आंदोलन — भीम आर्मीचा इशारा

Wed 04-Mar-2026,01:11 AM IST -07:00
Beach Activities

लादेन नगर येथील विस्थापितांना तात्काळ पुनर्वसन द्या; अन्यथा तीव्र आंदोलन — भीम आर्मीचा इशारा

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) परिसरातील लादेन नगर येथील सुमारे ४० वर्षे जुनी गरीब वस्ती अलीकडे वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण म्हणून हटविण्यात आली. या कारवाईत अनेक कुटुंबांची घरे तोडण्यात आल्याने ते कुटुंबीय बेघर झाले असून त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, ते अनेक दशकांपासून त्या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्याकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखले तसेच शैक्षणिक कागदपत्रे यांसारखे भारतीय नागरिकत्व व वास्तव्यासंदर्भातील पुरावे उपलब्ध आहेत. तरीदेखील त्यांच्यावर परप्रांतीय (बांग्लादेशी) असल्याचे आरोप करण्यात आल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वर्धा जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन विस्थापित कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने दि. २ मार्च २०२६ रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

जिल्हाध्यक्षांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, दि. ५ मार्च २०२६ पर्यंत पुनर्वसनाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास ५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

संघटनेच्या वतीने प्रशासनाला मानवीय दृष्टिकोनातून तात्काळ न्याय देऊन प्रभावित गरीब कुटुंबांचे पुनर्वसन करावे, जेणेकरून त्यांना सन्मानाने जीवन जगता येईल, अशी मागणी करण्यात आली आहे.