वर्ध्यात अवैध पेट्रोल-डिझेल तस्करीचा पर्दाफाश
वर्ध्यात अवैध पेट्रोल-डिझेल तस्करीचा पर्दाफाश
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ₹५,७३,०४० चा मुद्देमाल जप्त
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण
वर्धा : वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या पेट्रोल-डिझेलची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली. या कारवाईत चारचाकी वाहनासह एकूण ₹५,७३,०४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गस्ती दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, दोन इसम पांढऱ्या रंगाच्या Maruti Suzuki Eeco (MH 32 AS 4843) या वाहनातून मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पेट्रोल व डिझेल अवैध विक्रीसाठी घेऊन जात आहेत.
पेट्रोल पंपाजवळ सापळा
मिळालेल्या माहितीनुसार महिलाश्रम परिसर, सेवाग्राम रोडवरील Indian Oil Corporation च्या राजपाल पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी सापळा रचून वाहन अडवले. वाहन चालक समीर शकील शेख (वय २२, रा. विकास चौक, सेलू) व त्याचा साथीदार रविंद्र विठ्ठलराव चौरे (वय ४५, रा. केळझर, सेलू) यांना ताब्यात घेण्यात आले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
१४ प्लास्टिक कॅन (२० लिटर प्रत्येकी) — २८० लिटर पेट्रोल — ₹२९,१२०
६ प्लास्टिक कॅन (२० लिटर प्रत्येकी) — १२० लिटर डिझेल — ₹१०,९२०
२० रिकामे प्लास्टिक कॅन — ₹६,०००
मारुती सुझुकी ईको वाहन — ₹५,००,०००
२ अँड्रॉईड मोबाईल — ₹२७,०००
एकूण जप्ती : ₹५,७३,०४०
विनापरवाना साठवणूक
चौकशीत आरोपींकडे पेट्रोल-डिझेल वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना किंवा खरेदीची पावती नसल्याचे उघड झाले. आरोपी क्रमांक २ हा रस्त्याने जाणाऱ्या टँकर चालकांकडून कमी दरात पेट्रोल-डिझेल खरेदी करून त्याचा साठा करत होता व नंतर तो पेट्रोल पंप चालक गिरीश राजपाल यांच्याकडे सुपूर्द करत असल्याची कबुली दिली आहे.
या कलमान्वये गुन्हा दाखल
वर्धा (शहर) पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पुढील कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे :
अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७
भारतीय दंड संहिता २०२३ कलम २८७ व ३(५)
पेट्रोलियम अधिनियम १९३४ कलम ८
मोटार वाहन अधिनियम कलम ३(१), १८१ व १३०/१७७
कारवाईतील अधिकारी
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, एसपीएन आशीष सिंह ठाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलिसांचा इशारा
अवैध ज्वलनशील पदार्थांची साठवणूक व वाहतूक करणे हा केवळ कायद्याने गुन्हा नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका आहे. वर्धा पोलिसांकडून अशा प्रकारांवर कठोर लक्ष ठेवण्यात येत असून पुढेही कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.