वैदर्भीय कन्या वैशाली राऊत यांची राज्य प्रबंधकपदी नियुक्ती
वैदर्भीय कन्या वैशाली राऊत यांची राज्य प्रबंधकपदी नियुक्ती
महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाच्या पहिल्या पूर्णवेळ प्रबंधकपदाचा बहुमान
नावेद पठाण मुख्य संपादक
मुंबई, दि. 23 (संदीप रघाटाटे) – राज्यातील नर्सिंग शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळच्या प्रबंधकपदी वैदर्भीय कन्या वैशाली बेबीताई छत्रपती राऊत (उर्फ वैशाली प्रवीण राऊत) यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. मंडळाच्या पहिल्या पूर्णवेळ प्रबंधक म्हणून विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत 2018 साली स्थापन झालेल्या या स्वायत्त मंडळामार्फत राज्यातील सुमारे 1200 हून अधिक मान्यताप्राप्त शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये एएनएम व जीएनएम पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. भारतीय परिचर्या परिषदेच्या निकषांनुसार नर्सिंग शिक्षणाची अंमलबजावणी केली जाते.
मागील दोन वर्षांपासून सहप्रबंधक म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत असताना तसेच प्रबंधकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना वैशाली राऊत यांनी मंडळात विविध सुधारणा राबवल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन नियमावली लागू केली, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक केली तसेच गैरप्रकार करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई केली. विद्यार्थ्यांना राज्य, देश व परदेशात नोकरीच्या संधी मिळताना त्यांच्या प्रमाणपत्रांची तात्काळ पडताळणी व्हावी यासाठी ऑनलाईन प्रमाणपत्र प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
त्यांच्या प्रशासकीय दृष्टी, दीर्घ अनुभव आणि गुणवत्तावृद्धीच्या धडाडीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांची प्रबंधकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. अधिपरिचारिका संवर्गातील अधिकाऱ्याला ही जबाबदारी देण्यात आल्याने राज्यातील परिचारिका वर्गातून आनंद आणि अभिमान व्यक्त होत आहे.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वासी येथे जन्मलेल्या वैशाली राऊत या देवळी तालुक्यातील अंदोरी येथील सून आहेत. त्यांनी नागपूर येथील माधुरीताई देशमुख नर्सिंग विद्यालयातून जीएनएम पदविका पूर्ण केली असून नवी मुंबई येथील तेरणा नर्सिंग महाविद्यालयातून एमएससी नर्सिंग पदवी संपादन केली आहे.
अकोला, नागपूर व मुंबई येथील शासकीय रुग्णालयांत अधिपरिचारिका म्हणून कार्य करताना त्यांनी प्रशासकीय व शैक्षणिक कौशल्य विकसित केले. प्रतिनियुक्तीवर पाठ्यनिर्देशिका म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. मंडळाच्या सहप्रबंधकपदावर कार्यरत असताना त्यांनी घेतलेल्या कठोर पण सकारात्मक निर्णयांची दखल मुंबई उच्च न्यायालयानेही घेतली असून गैरप्रकार करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा निर्णय योग्य ठरविला आहे. तसेच सोलापूर येथील सामाजिक संस्थेकडून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
राज्यातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या या व्यापक यंत्रणेची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ग्रामीण विदर्भातून राज्यस्तरावर झेप घेतलेल्या वैशाली राऊत यांची ही नियुक्ती केवळ वैयक्तिक यश नसून नर्सिंग क्षेत्रातील हजारो विद्यार्थिनी व अधिपरिचारिकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. तसेच त्या महाराष्ट्र परिचर्या परिषदेत शासन नियुक्त सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.