आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

Tue 19-May-2026,09:49 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर– चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून 2026 रोजी होणार असून, तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 469 मतदार चंद्रपूर जिल्ह्यातील असून, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 सदस्यांचा समावेश आहे.

तिन्ही जिल्ह्यांमध्ये 18 मेपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, सर्व संबंधितांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

आणखी शोधा

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख तसेच निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार

या निवडणुकीत चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य, जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि 7 नगर पंचायतींचे मिळून एकूण 469 मतदार मतदान करणार आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषद आणि 9 नगर पंचायतींमधील 244 सदस्य, तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांमधील 264 सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

आणखी शोधा

दरम्यान, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा परिषदांमध्ये सध्या सदस्यसंख्या शून्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

17 मतदान केंद्रांची व्यवस्था

वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागीय मुख्यालय स्तरावर एकूण 17 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

मतमोजणी प्रक्रिया चंद्रपूर जिल्हा स्तरावर पार पडणार असून, निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली.