जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत जांगोणा शाळेचा विजयी चौकार
मुख्य संपादक अब्दुल कदिर बक्श
हिंगणघाट : तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा, जांगोणा केंद्र - पोहणा ही शाळा अल्पावधीतच शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून, आज शाळा यशाच्या शिखरावर विराजमान झाली आहे. जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धेत मिळविलेल्या घवघवीत यशामुळे शाळेच्या यशस्वी वाटचालीत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.या जिल्हास्तरीय स्पर्धेत जांगोणा शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवत एकाच वेळी चार प्रथम क्रमांक पटकावले. खो-खो - माध्यमिक मुले (प्रथम), खो-खो – प्राथमिक मुले (प्रथम), खो-खो – प्राथमिक मुली (प्रथम) तसेच 100 मीटर धावणे – प्राथमिक मुली (प्रथम) या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखविलेला आत्मविश्वास, वेग, चपळता आणि संघभावना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया आहे. क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संयम, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते. जांगोणा शाळेने शिक्षणासोबतच खेळांना दिलेले महत्त्व आज या दैदीप्यमान यशातून प्रकर्षाने दिसून येत आहे.या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक नरेश चौधरी यांचे सक्षम नेतृत्व, दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली सकारात्मक भूमिका महत्वाची ठरली आहे. तसेच मार्गदर्शक शिक्षक प्रदीप ताटेवार, नितीन खोडे, गणेश नवघरे यांनी घेतलेली अथक मेहनत, नियमित सराव आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.या यशस्वी वाटचालीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण तालवटकर, उपाध्यक्ष दिवाकर टापरे तसेच संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय पालकांचा विश्वास व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा हेही या यशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले आहेत. शिक्षण व क्रीडा यांचा समतोल साधत जांगोणा शाळा आज गुणवत्तेची, शिस्तीची आणि सातत्यपूर्ण यशाची ओळख बनली आहे.
या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैदीप्यमान यशाबद्दल वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या बक्षीस वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून, जिल्हास्तरावर यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुढील वाटचालीसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली.
अभिनंदनांचा वर्षाव…
जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वत्र खूप अभिनंदन होत आहे. जांगोणा शाळेची ही यशोगाथा निश्चितच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून, भविष्यातही शाळा अशीच नवनवे उच्चांक प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.