बनावट आयकर अधिकारी बनून घरात घुसण्याचा प्रयत्न; तिघे आरोपी अटकेत

Thu 05-Mar-2026,03:08 AM IST -07:00
Beach Activities

बनावट आयकर अधिकारी बनून घरात घुसण्याचा प्रयत्न; तिघे आरोपी अटकेत

प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा 

वर्धा | ४ मार्च २०२६ वर्धा शहरातील श्रीनिवास कॉलनी, रामनगर येथील ८२ वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापक चिंतामन दशरथ कोंगरे यांच्या घरी बनावट आयकर अधिकारी बनून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी बनावट ओळखपत्र व बनावट तपासणी वॉरंट दाखवून घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला.

प्राप्त माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता चिंतामन कोंगरे हे घराच्या हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी त्यांची सून शुभांगी सुहास कोंगरे व नात गार्गी सुहास कोंगरे घरातील कामात व्यस्त होत्या. दरम्यान दरवाज्याची बेल वाजल्याने कोंगरे यांनी दरवाजा उघडला असता, एमएच-३१ एफएक्स-७९८४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनासह तीन जण उभे असल्याचे दिसले.

त्यातील दोघांनी आपली नावे १) किसान ज्ञानेश्वर पर्वत व २) चेतन रमेश चव्हाण अशी सांगून स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवले. त्यांनी बनावट तपासणी वॉरंट दाखवत घराची झडती घेणार असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत चालक अभिषेक विश्वकर्मा उपस्थित होता. आरोपींनी कोंगरे यांच्याकडे लॉकरची माहिती, बँक पासबुक, सोने-चांदी, आयकर विवरणपत्र (ITR) व इतर आर्थिक कागदपत्रांची मागणी केली. सहकार्य न केल्यास उत्पन्न लपवल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली.

कोंगरे यांनी आपल्या सर्व आर्थिक कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे असल्याचे सांगितले. यावर आरोपींनी त्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोंगरे यांनी चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयात येण्याचा प्रस्ताव दिला, ज्यास आरोपी तयार झाले. घराबाहेर पडताना संशय आल्याने कोंगरे यांनी आपल्या नातीला आरोपींच्या ओळखपत्रांचे व वाहनाचे छायाचित्र मोबाईलवर टिपण्यास सांगितले.

कोंगरे स्कूटीने तर आरोपी कारने चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयात पोहोचले. तेथे ओळखपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान कोंगरे यांचे सुपुत्र सुहास चिंतामन कोंगरे तसेच त्यांचे मित्र प्रवीण हिवारे हेही घटनास्थळी पोहोचले. पडताळणीत संपूर्ण फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले व वाहनासह रामनगर पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत बनावट ओळखपत्र व बनावट तपासणी वॉरंटच्या आधारे आयकर अधिकारी असल्याचे भासवून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून पीडित चिंतामन कोंगरे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

समक्ष:

पो. ह. वा. चंद्रशेखर नेहारे (बी.ए. ६७५)

रामनगर पोलीस स्टेशन,